एटापल्ली तहसील कार्यालयाचा माणुसकीचा पुढाकार; सेवा संकल्प अभियानातून रक्तदानाचा संदेश!
एटापल्ली, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : शासकीय कर्तव्य बजावत असतानाच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत एटापल्ली तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सेवा संकल्प अभियानांतर्गत तहसील कार्यालय परिसरात आयोजित या उपक्रमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासोबतच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदायी ठरते. हीच भावना मनात ठेवून महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. प्रशासकीय कामकाजासोबतच समाजहिताच्या उपक्रमांमध्येही सक्रिय योगदान देता येते, याचे उदाहरण या शिबिरातून पाहायला मिळाले.
या रक्तदान शिबिराला सहाय्यक महसूल अधिकारी गणेश गेडाम, मंडळ अधिकारी भूषण जवंजाळकर, मंडळ अधिकारी चंद्रशेखर बोकडे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. रक्तदानाविषयी जनजागृती वाढविणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ या भावनेला कृतीची जोड देत एटापल्ली महसूल विभागाने सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला.

