13 Sep 2026, Sun

डोंगरगाव (भू), ठाणेगावचा वैरागड अप्पर तहसील कार्यालयात समावेश करू नये ; आरमोरी तहसील कायम ठेवावी – सदानंद कुथे..

डोंगरगाव (भू), ठाणेगावचा वैरागड अप्पर तहसील कार्यालयात समावेश करू नये ; आरमोरी तहसील कायम ठेवावी – सदानंद कुथे..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

आरमोरी : मौजा वैरागड येथे प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात डोंगरगाव (भू) व ठाणेगावचा समावेश करण्यास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. याबाबत त्यांनी मा. उपविभागीय अधिकारी (राजस्व), देसाईगंज (वडसा) यांच्याकडे लेखी हरकत सादर करून संबंधित गावांचा समावेश आरमोरी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
मा. उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालय, देसाईगंज (वडसा) यांच्या दिनांक २३ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार मौजा वैरागड येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याची कार्यवाही सुरू असून, या कार्यालयात वैरागड व पिसेवडधा महसूल मंडळांचा समावेश प्रस्तावित आहे. या निर्णयास कुथे यांनी कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र वैरागड महसूल मंडळात समाविष्ट असलेल्या डोंगरगाव (भू) व तलाठी साजा क्रमांक ७ अंतर्गत ठाणेगाव या गावांचा प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयात समावेश करण्यात येत असल्याने त्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, डोंगरगाव (भू) हे गाव आरमोरीपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असून वैरागडपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर आहे. गावातील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, मजुरी, आठवडी बाजार, शिक्षण, बँक व्यवहार तसेच इतर शासकीय व खाजगी कामे प्रामुख्याने आरमोरी येथेच होत असल्याने नागरिकांची सर्व प्रकारची ये-जा आरमोरीशी निगडित आहे.
ग्रामीण भागात दळणवळणाच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता केवळ महसूल मंडळाच्या कारणास्तव संबंधित गावांचा वैरागड अप्पर तहसील कार्यालयात समावेश करणे अन्यायकारक ठरेल, असे कुथे यांनी निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे तलाठी साजा क्रमांक ७ मधील डोंगरगाव (भू) व ठाणेगाव या गावांना वैरागड महसूल मंडळातून वगळून जवळच्या देऊळगाव महसूल मंडळात समाविष्ट करण्यात यावे. तसेच या गावांचे तहसील कार्यालय आरमोरीच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची दैनंदिन सोय आणि प्रशासनाशी सुलभ संपर्क या बाबींचा विचार करून आपल्या हरकतीचा स्वीकार करावा व संबंधित गावांवर होणारा अन्याय टाळून न्याय द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी उपविभागीय अधिकारी (राजस्व), देसाईगंज (वडसा) यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!