गडचिरोलीच्या आरोग्य सेवेचा विस्तार: CPHC प्रशिक्षणाद्वारे आरोग्य यंत्रणा सक्षम..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली(DEMO):- आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर’ (CPHC) म्हणजे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याच्या वडसा तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाद्वारे अद्ययावत वैद्यकीय सेवांचे धडे देण्यात आले.
प्रशिक्षणातील मुख्य विषय:__
या प्रशिक्षणात माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये खालील महत्त्वाच्या विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले:
माता आरोग्य: गरोदर मातांची तपासणी, प्रसूती व्यवस्थापन, प्रसूती पश्चात रक्तस्राव आणि रक्तदाब व्यवस्थापन, प्रसूती दरम्यान झटके आल्यास करावयाची उपाययोजना व PPIUCD तंत्रज्ञान.
बाल आरोग्य : नवजात बालकांची विशेष काळजी आणि अर्भक पुनरुज्जीवन (Newborn Resuscitation) प्रशिक्षण.
इतर सेवा: संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार व्यवस्थापन, मुखरोग तपासणी, कुटुंब कल्याण मार्गदर्शन तसेच आयुष व योगाचे महत्त्व.
आरोग्य संपन्न गावासाठी जनसहभाग:
केवळ तांत्रिक प्रशिक्षणच नव्हे, तर ‘आरोग्य संपन्न गाव’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गावस्तरावरील लोकसहभागावर भर देण्यात आला. सरपंच आणि ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून ‘आरोग्य पत्रिका’ बनवण्यावर चर्चा करण्यात आली. गावातील विविध विभागांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून आरोग्यदायी वातावरण निर्मिती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शालेय आरोग्य शिक्षण मध्ये शालेय मानसिक आरोग्य तसेच किशोरवयीन मुला-मुलींचे पोषण, किशोरवयीन मुलींचे पाळी दरम्यान स्वास्थ्य आणि स्वच्छता, मुख रोग यावर अनुक्रमे श्री अजय खेळकर, श्रीमती मीना वाळके ,डॉ.दीक्षांत मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी लाभलेले प्रशिक्षक- डॉ प्रफुल हुलके, डॉ बागराज धुर्वे, डॉ प्रशांत पेंदाम, डॉ रुचिता खांडरे, डॉ संजय सुपारे, श्रीमती लीना मडावी, श्रीमती मीनल वाळके, श्री विनोद सोनकुसरे, श्री. अजय खेरकर लाभलेले आहेत.
मातामृत्यू, बालमृत्यू आणि अर्भक मृत्यू रोखण्यासाठी गडचिरोली आरोग्य विभाग पूर्णपणे कटिबद्ध असून, दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संकल्प या प्रशिक्षण सत्रातून व्यक्त करण्यात आला.

