गडचिरोली :- जिल्ह्यातील वादग्रस्त राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी च्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सहा वर्षांपासून सुरू असलेले हे काम अर्धवट सोडून कंत्राटदार चक्क ‘बेपत्ता’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
गडचिरोलीतील राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी चे काम अर्धवट असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वादग्रस्त राष्ट्रीय महामार्ग ३५३-सी च्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. सहा वर्षांपासून सुरू असलेले हे काम अर्धवट सोडून कंत्राटदार चक्क ‘बेपत्ता’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून देखील अनेक महत्त्वाची विकासकामे अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कमालीच्या अडचणींचा सामना करावा लागत असून, ‘शासनाचे नेमके लक्ष कुठे आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
“सहा वर्षांपासून नरक यातना”__
२०२१ पासून अधिकृतरित्या या महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी, प्रत्यक्षात सहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही हा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. कंत्राटदाराने केवळ ठराविक काम करून उर्वरित मार्ग वाऱ्यावर सोडला आहे. कामाचा दर्जा प्रचंड सुमार असून सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात पसरलेली गिट्टी आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांना समोरचे काहीही दिसेनासे झाले आहे. यामुळे दुचाकी घसरणे, टायर पंक्चर होणे आणि अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. या धुळीच्या साम्राज्यामुळे लगतच्या गावांमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.
“कंत्राटदाराचा ‘पत्ता’ नाही”__
संबंधित कंत्राटदार गेल्या काही काळापासून कामाच्या ठिकाणाहून गायब असून, त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. जिल्ह्याचा कारभार थेट मुख्यमंत्र्यांच्या हाती असतानाही कंत्राटदाराची ही मनमानी आणि प्रशासनाची ढिलाई चर्चेचा विषय ठरत आहे. संतप्त नागरिकांनी आता प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित कंत्राटदाराला तातडीने ‘काळ्या यादीत’ टाकण्याची मागणी केली आहे.
“२९ एप्रिलला ‘रस्ता रोको’__
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून येत्या २९ एप्रिल रोजी मौजा मोसम येथील संड्रा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात दळणवळणाचा मुख्य कणा असलेला हा महामार्ग प्रशासकीय अनास्थेमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी अपेक्षा याभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
___________________________________________
मधल्या काही काळापासून वनविभागाकडून वृक्ष तोडीची परवानगी न मिळाल्याने काम रखडले होते. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामात आता कुठलीच अडचण नाही. संबंधित कंत्राटदाराला नोटीस देऊन सक्त ताकीद दिली असून वेळ पाडल्यास त्याच्याकडून हे काम काढून घेण्यात येईल. – प्रफुल केळकर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गडचिरोली.
___________________________________________

