10 Jun 2026, Wed

कुरखेडा शहरातील महामार्ग सिमेंट रस्ता व सती नदी पुलाच्या कामाला गती द्या..

केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी..

फुलचंद वाघाडे/ न्यू विदर्भ केसरी & जिल्हा गर्जना न्यूज..

कुरखेडा :– कुरखेडा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्ता आणि सती नदीवरील मोठ्या पुलाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामामुळे शहरवासीयांसह तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केंद्रीय सडक परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांनी रस्ता व पुलाच्या कामाची गती तातडीने वाढवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

यावेळी चांगदेव फाये यांच्या सोबत निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक श्रीकांत नागीलवार, भारतीय जनता पार्टी तालुका महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर गुलाब मस्के व पदाधिकारी उपस्थित होते.

सदर पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात नदीत पाणी वाढल्यावर तात्पुरते रस्ते अनेकदा वाहून जातात. परिणामी, नागरिकांना अनेक किलोमीटरचा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत आहे. चांगदेव फाये यांनी सांगितले की, वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून येत्या दोन महिन्यांत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने दुर्लक्ष न करता कंत्राटदाराला काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच नागरिकांना होत असलेला त्रास तातडीने दूर करावा, अशी मागणी चांगदेव फाये यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्ता व पुलाच्या कामांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशीही मागणी चांगदेव फाये यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!