विकास, शांतता व हरित जिल्ह्याच्या दिशेने वेगवान वाटचाल..
फुलचंद वाघाडे / न्यू विदर्भ केसरी & जिल्हा गर्जना न्यूज..
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार व्यक्त केला.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सहपालकमंत्री पुढे म्हणाले की, एकेकाळी विकासापासून दूर असलेला गडचिरोली जिल्हा आज परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माओवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत जिल्ह्यात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण, अटक आणि कारवायांमुळे माओवाद्यांचा प्रभाव कमी झाला असून पोलीस मदत केंद्रांच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
शांततेच्या वातावरणासोबतच जिल्ह्यात विकासकामांचा वेगही वाढला आहे. औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून भविष्यात लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांमुळे गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास येत आहे. वनसंपदा आणि पर्यावरण जपत हरित विकासाचा मार्ग स्वीकारत जिल्ह्याला देशातील अग्रगण्य हरित जिल्हा बनविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. वृक्षलागवडीच्या व्यापक मोहिमेद्वारे पुढील काळात पाच कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पायाभूत सुविधांवर भर देत त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते व पूल बांधकामांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून गडचिरोली-आरमोरी चौपदरीकरणासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. खनिज वाहतुकीमुळे वाढलेल्या ताणाचा विचार करून रस्ते विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६९७ कोटी रुपयांचा शंभर टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य क्षेत्रात जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत ३.० टेस्ला एमआरआय मशीन सुरू करण्यात येत असून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाखो नागरिकांना लाभ मिळत आहे. ग्रामीण भागात जल जीवन मिशनमुळे नळजोडण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आणि विविध ग्रामीण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जीवनमान उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती व शेतकरी सक्षमीकरणासाठी बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, सौर कुंपण, तसेच ‘कोया कृषी कुंभ’ सारख्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम केले जात आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत असून तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत.
वनहक्क पट्टेधारकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘फार्मर आयडी’ तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मनरेगा, प्रधानमंत्री जनमन योजना आणि वनोपज विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“गडचिरोली हा केवळ नकाशावरील जिल्हा नसून बदलाची जिवंत कहाणी आहे. विकास, पर्यावरण आणि सामाजिक सक्षमीकरण यांचा समतोल साधत आपण समृद्ध गडचिरोली घडवत आहोत,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्र दिनी सर्वांनी हरित, सुरक्षित व विकसित जिल्हा घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. तसेच खनिज निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या फूड व्हॅन व रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

