10 Jun 2026, Wed

विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाबाबत गुरवळा–हिरापूर ग्रामस्थांमध्ये संभ्रम…

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी गावकऱ्यांसह घेतली आढावा बैठक_

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- गडचिरोली शहर परिसरातील गुरवळा, हिरापूर, राखी आदी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी होणाऱ्या भूमी अधिग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम, चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेती जमिनी शासनाकडून अधिग्रहित केल्या जाणार असल्याच्या चर्चेमुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या भावना आणि समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी गुरवळा व हिरापूर येथे भेट देत ग्रामस्थांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली.

या बैठकीत दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दांत मांडल्या. ग्रामस्थांनी सांगितले की, शेती ही केवळ जमीन नसून आमची आई- माता,आत्मा असुन ती आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आमच्या परंपरेचा वारसा आणि वडिलोपार्जित जीवनाचा आधार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शेती जमीन देणार नसल्याची ठाम भूमिका गावकऱ्यांनी बैठकीत मांडली. यावेळी परिसरात एकच आवाज घुमला—

“आम्ही शेती देणार नाही…!”

ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, शेतकरी आणि गावकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय होऊ दिला जाणार नाही. आपण नेहमीच शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.

तसेच या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन गावातील शिष्टमंडळासोबत सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनीही ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भूमी अधिग्रहणासंदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना, समस्या आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय्य मार्ग काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

या ग्रामस्थ आढावा बैठकीला किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, जेष्ठ नेते प्रमोदजी पिपरे,भाजपा जेष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा तालुकाध्यक्ष दतू सुत्रपवार, भाजप युवा नेते अनिल तिडके, राहुल पोरेड्डीवार, गुरवळा सरपंच जया मंटकवार, हिरापूर सरपंच शालिनी कुमरे, राखी सरपंच ज्योती तलांडे, उपसरपंच दिवाकर मिसार, पो.पा. कुसुम बारसागडे, शेतकरी विकास जेंगठे, रंजित निकुरे, देवानंद कुमरे, सुरज देशमुख, अँड. बांबोळे ताई, धनराज भांडेकर, परिक्षित बांबोळे, किशोर आयतूलवार, अनिल कोठारे, कात्याजी चिचघरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ पदाधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना आपले प्रश्न थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याचे व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या समस्यांवर सकारात्मक आणि न्याय्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!