‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली (जि वि मा अ) :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी माननीय ना. श्री. प्रकाशजी आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. याच मोहिमेला मूर्त रूप देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने प्रभावी पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील सर्व ४५९ ग्रामपंचायतींनी या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
मंत्र्यांची संकल्पना आणि जिल्हा प्रशासनाची अंमलबजावणी–
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी मांडलेल्या ‘आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेचा मूळ उद्देश प्रत्येक खेडे आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि आजारमुक्त बनवणे हा आहे. या संकल्पनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे स्वतः लक्ष घालत असून, दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
“माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न गाव’ साकारण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग हा या मोहिमेच्या यशस्वीतेचा मोठा पुरावा आहे.”
सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली.
“आरोग्य संपन्न गावाची संकल्पना ही लोकसहभागाशिवाय अपूर्ण आहे. जेव्हा ग्रामपंचायत, प्रशासन आणि नागरिक एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांती घडते. गडचिरोली जिल्हा प्रशासन या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहे. माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या आरोग्य चळवळीत स्वतःला झोकून द्यावे आणि आपले गाव निरोगी व समृद्ध बनवावे.”
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..
आरोग्य विषयक उपक्रमांचा धडाका__
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जिल्ह्यात विविध आरोग्यवर्धक उपक्रम राबवणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
सर्वसमावेशक आरोग्य तपासणी:__ गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करून नागरिकांची आरोग्य तपासणी करणे.
कुटुंब कल्याण कार्यक्रम:– माता-बाल संगोपन आणि कुटुंब कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना:-– साथरोग नियंत्रण आणि स्वच्छतेबाबत व्यापक स्तरावर जनजागृती करणे.
ग्रामपंचायतींशी संवाद आणि प्रशासकीय आवाहन__
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज भोयर यांनी या मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींशी संवाद (डायलॉग) साधून त्यांना मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावाने आपले आरोग्यविषयक उद्दिष्ट साध्य करून हे अभियान एका लोकचळवळीच्या स्वरूपात राबवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
एकजुटीने निरोगी गडचिरोलीकडे —
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ४५९ ग्रामपंचायतींच्या सहभागामुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सुधारेल आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘आरोग्य संपन्न’ गाव निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
डॉ. प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली

