27 Jul 2026, Mon

एकच दिवसात २७ मातांवर यशस्वी दूरबीन शस्त्रक्रिया ; आरोग्य विभागाचा कौतुकास्पद पुढाकार..

गडचिरोली जिल्ह्यात ‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी!!

​न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

​मुलचेरा (गडचिरोली)(जि वि मा अ ):- गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला. मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आज एकाच दिवसात तब्बल २७ मातांवर ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन’ (दूरबीनद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया) यशस्वीरित्या पार पडल्या. गडचिरोली जिल्हा आणि मुलचेरा तालुक्यामध्ये अशा प्रकारची अत्याधुनिक ‘सिंगल पंक्चर’ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळाली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी स्वतः हाताळली शस्त्रक्रियेची धुरा:__
या ऐतिहासिक मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळ मार्गदर्शक म्हणून न थांबता, जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी स्वतः प्रत्यक्ष पुढाकार घेऊन या सर्व २७ शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने आणि यशस्वीरित्या पार पाडल्या.

​तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अहोरात्र मेहनत__
​या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या चमूने अतोनात परिश्रम घेतले. यामध्ये:
​डॉ. स्मिता साळवे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत आणि शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले व अथक परिश्रम घेतले.

भूलतज्ज्ञ (Anesthetist) डॉ. समीर बनसोडे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत चोख कामगिरी बजावली. सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न करून गरजू मातांपर्यंत पोहोचून त्यांचे समुपदेशन केले.

​रुग्णालय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य__
​हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात केवळ डॉक्टरच नव्हे, तर मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील सर्व परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यानी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या तत्पर सेवेमुळेच एकाच दिवसात 27 शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडू शकल्या.

​’सिंगल पंक्चर’ शस्त्रक्रियेचे महत्त्व__
​”सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये पोटावर केवळ एक लहान छिद्र करून दूरबीनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. यात रक्तस्त्राव अत्यंत कमी होतो, टाके पडत नाहीत आणि रुग्णाला वेदनाही कमी होतात. शस्त्रक्रियेनंतर माता अत्यंत जलद गतीने बऱ्या होऊन घरी परततात. दुर्गम भागातील महिलांसाठी ही अत्याधुनिक सेवा अत्यंत वरदान ठरणारी आहे.” — डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्यचिकित्सक)..

मुलचेरा सारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून मातांना सेवा देणे, हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आरोग्य विभागाच्या या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कमी वेदना, झटपट आराम!
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबविणार ‘सिंगल पंक्चर’ शिबिरांचा पॅटर्न:__
मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील या यशानंतर, हा आधुनिक शस्त्रक्रिया पॅटर्न आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दुर्गम व आदिवासी भागातील मातांपर्यंत ही अत्याधुनिक आणि विनावेदनेची वैद्यकीय सेवा पोहचवण्यासाठी विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारच्या ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक’ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाईल, जेणेकरून जिल्ह्यातील कोणतीही माता या सुविधेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

​दिनांक: २९ मे २०२6
स्थळ: मुलचेरा, गडचिरोली

   ( जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!