10 Jun 2026, Wed

“जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे चित्रकला व निबंध स्पर्धांद्वारे जनजागृती”…

तंबाखूमुक्त समाजासाठी जनजागृतीची गरज; जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. 

गडचिरोली, :- “भ्रामक आकर्षणाचा पर्दाफाश करूया; निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाविरुद्ध लढा देऊया” या जागतिक घोषवाक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे जागतिक तंबाखू विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः डॉ. लहाडे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. बागराज धूर्वे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. इंद्रजीत नगदेवते (भिषक तज्ज्ञ), डॉ. मनीष मेश्राम (भिषक तज्ज्ञ), डॉ. चंद्रशेखर शानगोंडा (दंत शल्यचिकित्सक), डॉ. प्रेरणा राऊत (जिल्हा सल्लागार), डॉ. मृणाली रामटेके तसेच श्रीमती फेबूलवार (मेट्रन) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. प्रेरणा राऊत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडताना तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “प्रत्येक दिवस हा तंबाखू विरोधी दिन असला पाहिजे,” असे सांगत त्यांनी तंबाखूविरोधी जनजागृती सातत्याने राबविण्याचे आवाहन केले. दंत शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर शानगोंडा यांनी मौखिक आरोग्याचे महत्त्व विशद करताना तंबाखूच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचे आजार आणि इतर गंभीर व्याधी उद्भवू शकतात, असे सांगितले. तोंडामध्ये पांढरे किंवा लाल चट्टे, जखमा अथवा इतर असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित मौखिक तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. वर्षा लहाडे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी तंबाखूमुक्त जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तंबाखूचे सेवन केवळ मौखिक आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी घातक असून कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकारांसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरते, असे त्यांनी सांगितले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नर्सिंग विद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांसाठी तंबाखू विरोधी चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत हरिशकुमार कोठावार यांनी प्रथम, तेजस्विनी वासनिक यांनी द्वितीय तर अलपेशा खेवले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. निबंध स्पर्धेत हरिशकुमार कोठावार यांनी प्रथम, तोशिना नाकडे यांनी द्वितीय आणि तेजस्विनी वासनिक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांवर प्रभावी चित्रे व विचार मांडून तंबाखूमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रेरणा राऊत, मिना दिवटे, राहुल चावरे, वैशाली बोबाटे, शिल्पा सरकार (स्टाफ नर्स), भूपेश दरडमारे तसेच नर्सिंग विद्यार्थिनी यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!