प्राथमिक आरोग्य केंद्र, सावंगी येथे दिली आकस्मिक भेट; आरोग्य यंत्रणेला दर्जेदार सेवा देण्याचे निर्देश.
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली (DEMO ) 06:- नागपूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक मा. डॉ. शशिकांत शंभरकर यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथील ‘शहीद वीर बाबुराव शेडमाके हॉल’ मध्ये एक विस्तृत आढावा सभा संपन्न झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटूळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO), ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक (MS), प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी (MO) आणि सर्व जिल्हा स्तरीय आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय कार्यक्रमांचा घेतला सविस्तर आढावा___ बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच प्रमुख राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने माता-बाल आरोग्य, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे, नियमित लसीकरण, कुपोषण निर्मूलन, क्षयरोग (TB) व कुष्ठरोग नियंत्रण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. दुर्गम व आदिवासी भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा विनाविलंब पोहोचली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका डॉ. शंभरकर यांनी यावेळी मांडली. ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषधसाठा, मनुष्यबळ आणि उपकरणांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी यंत्रणेकडून माहिती घेतली.
मान्सूनपूर्व आरोग्य तयारी आणि हिवताप (मलेरिया) सर्वेक्षणाचा सविस्तर आढावा___ आगामी पावसाळा लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे यांनी जिल्ह्यातील मान्सूनपूर्व आरोग्य तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाळ्यात दुर्गम भागातील संपर्क तुटण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले.
या अंतर्गत त्यांनी खालील महत्वपूर्ण सूचना केल्या:
जलद गतीने हिवताप (मलेरिया) सर्वेक्षण__ पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढून हिवताप आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात तातडीने ‘मान्सूनपूर्व हिवताप सर्वेक्षण मोहीम’ राबवण्याचे आदेश दिले. संशयास्पद रुग्णांचे रक्तनमुने घेणे आणि तापाच्या रुग्णांवर त्वरित उपचार सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. औषधसाठा आणि कीटकनाशक फवारणी: ग्रामीण व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये पावसाळ्यातील आजारांवर लागणारा आवश्यक औषधसाठा, ओआरएस (ORS) पाकिटे आणि इतर वैद्यकीय साहित्याची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करावी. तसेच, संवेदनशील गावांमध्ये डास प्रतिबंधक कीटकनाशक फवारणी आणि अबेटिंग (Abating) मोहीम प्रभावीपणे राबवावी.
आरोग्य उपकेंद्रांना सतर्कतेचा इशारा____पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो, अशा गावांसाठी आधीच वैद्यकीय पथके तयार ठेवावीत. ‘साथरोग नियंत्रण’ कक्षाने जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्यावर बारीक लक्ष ठेवावे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचवणे शक्य होईल.
MJPJY’ (महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना) बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण___ आढावा सभेदरम्यान, उपसंचालक डॉ. शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी (MO) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या (MJPJY) प्रभावी अंमलबजावणीसाठी एका सविस्तर प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. यामध्ये खालील मुख्य मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला:
योजनेचा विस्तार आणि व्याप्ती___ गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब व गरजू रुग्णांना या योजनेचा मोफत लाभ कसा मिळवून देता येईल, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाईन क्लेम आणि कागदपत्रे__ योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे क्लेम वेळेत मंजुरीसाठी पाठवणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि कागदपत्रांची पूर्तता अचूक कशी करावी, याचे तांत्रिक प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
रुग्णांना तात्काळ लाभ मिळवून देणे__ रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही पात्र रुग्णाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, तसेच तातडीच्या उपचारांसाठी (Emergency Cases) या योजनेचा वापर कसा करावा, याबाबत डॉ. शंभरकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
पारदर्शकता आणि जनजागृती___ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर या योजनेबद्दल व्यापक जनजागृती करावी, जेणेकरून नागरिकांना उपचारासाठी खाजगी किंवा मोठ्या शहरात जाऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश__ सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात MJPJY योजनेचे संनियंत्रण स्वतः करावे, जेणेकरून दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत या मोफत वैद्यकीय उपचारांचा फायदा पोहोचेल.
प्रा. आ. केंद्र सावंगी येथे आकस्मिक भेट___ दौऱ्याच्या दरम्यान उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, सावंगी येथे कोणतीही पूर्वकल्पना न देता आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग (OPD), प्रसूती कक्ष, औषध साठा कक्ष आणि आंतररुग्ण विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. दैनंदिन अभिलेखांची (Records) तपासणी करून त्यांनी उपस्थित कर्मचारी व डॉक्टरांना सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि तत्परता आणण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्यालयाच्या ठिकाणी राहून रुग्णांना २४ तास दर्जेदार सेवा देणे कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक निर्देश__ आढावा सभेच्या शेवटी मार्गदर्शन करताना उपसंचालकांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय शिस्त पाळण्याचे निर्देश दिले. “आरोग्य सेवेसारख्या पवित्र क्षेत्रात काम करताना कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. राष्ट्रीय कार्यक्रमांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षकांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित संनियंत्रण (Monitoring) करावे,” अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.
डॉ. प्रताप शिंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी..

