10 Jun 2026, Wed

बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे ; कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नका..

कल्याणकारी योजनांचे लाभ थेट बँक खात्यात ; सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि.10 :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र बांधकाम कामगारांनी नोंदणी व नूतनीकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार विभागामार्फत करण्यात आले आहे. मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण व विविध लाभ योजनांचे अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातात. अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यानंतर संबंधित कर्मचारी व नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्यांची छाननी करून मंजुरी अथवा नामंजुरीबाबतचा निर्णय घेतला जातो. अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्यास त्याची माहिती कारणांसह संबंधित कामगाराला एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. बांधकाम कामगारांना देण्यात येणारे विविध आर्थिक व कल्याणकारी लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहेत. तसेच नोंदणी, नूतनीकरण किंवा लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ अथवा संघटनेची आवश्यकता नसल्याचे कामगार विभागाने स्पष्ट केले आहे.ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणीही पैशाची, कमिशनची किंवा लाचेची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा तक्रारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करता येतील. याबाबतच्या सूचना जिल्हा व तालुका कामगार सुविधा केंद्रांमध्ये दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत. नोंदणी, नूतनीकरण अथवा लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित कामगाराला निश्चित तारखेस उपस्थित राहण्याची सूचना देण्यात येते. लाभाच्या अर्जासंदर्भात पाठविण्यात येणाऱ्या पत्रातही मंडळाच्या सर्व सेवा विनामूल्य असल्याचे नमूद करण्यात येते. तसेच कोणाकडूनही पैशाची किंवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १०६४ वर किंवा acbwebmail@mahapolice.gov.in या ई-मेलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामगारांनी कोणत्याही आमिषाला अथवा फसवणुकीला बळी पडू नये, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच अर्ज करावेत. तसेच नियोक्ता किंवा ठेकेदारांनी त्यांच्या येथे कार्यरत असलेल्या पात्र बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतीने अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनीही केवळ पात्र बांधकाम कामगारांनाच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करावे, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचावा यासाठी नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!