मॉर्निंग वॉकदरम्यान अडवून बेदम मारहाण प्रकरण ; जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता..
गडचिरोली :- अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर बुधवारी सकाळी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आणि त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पांढरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हात-पायालाही मार लागला आहे. त्यांच्यावर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
मॉर्निंग वॉकदरम्यान अडवून बेदम मारहाण__ मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पांढरे हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास अहेरी-वेंकटरावपेठा मार्गावरील अबनपल्ली फाटा परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अजय कंकडालवार आणि त्यांच्या तीन साथीदारांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केल्याचा आरोप असून, या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत पांढरे यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता __ या हल्ल्यामागे जुना वाद कारणीभूत असल्याची चर्चा अहेरीत रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी अजय कंकडालवार यांची कोट्यवधी रुपयांची कथित अवैध बहुमजली इमारत प्रशासनाने पाडली होती. त्यानंतर कंकडालवार आणि कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यात अंतर्गत मतभेद व तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जाते. त्यातूनच हा हल्ला घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही.
चार जणांविरुद्ध गुन्हा__ दरम्यान, या प्रकरणी पांढरे यांच्या तक्रारीवरून अजय कंकडालवार, अजय नैताम, पिंटू मडावी आणि इतर एक अशा एकूण चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गडचिरोली जवळील सेमाना देवस्थाना जवळ काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांना अटक करून चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.

