गडचिरोलीतील शैक्षणिक वैभवाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट_
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, दि. १२ जून २०२६ :- गडचिरोली जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष ओळख निर्माण केलेल्या प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज येथे माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रहीम अमलानी यांची भेट घेऊन संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीविषयी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी तसेच भविष्यातील शैक्षणिक उपक्रमांविषयी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्था करीत असलेल्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज हे केवळ एक शैक्षणिक संस्थान नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारे ज्ञानमंदिर आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देत अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्यात या संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे उल्लेखनीय कार्य संस्था सातत्याने करीत आहे. यावेळी माजी खासदार डॉ. नेते यांनी प्राचार्य श्री. रहीम अमलानी यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शिक्षकांमधील समन्वय आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शिक्षण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला आदर्श जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. संवादादरम्यान डॉ. नेते यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. शिक्षणाच्या बळावर ज्ञान, कौशल्य आणि संस्कार आत्मसात करून समाज व राष्ट्राच्या विकासात आपले मोलाचे योगदान द्यावे. यशाचा मार्ग कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचारातूनच घडतो.” त्यांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत आगामी काळातही प्लॅटिनम जुबली हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज हे शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. या सदिच्छा भेटीमुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

