27 Jul 2026, Mon

VB G RAM G योजनेचा शुभारंभ ; जलसंधारण, सिंचन व १२५ दिवसांच्या रोजगार हमीवर भर..

गडचिरोली तालुक्यातील दिभना येथे विकसित भारत आजीविका अधिनियम (ग्रामीण) २०२६ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ..

VB G RAM G योजनेचा शुभारंभ ; जलसंधारण, सिंचन व १२५ दिवसांच्या रोजगार हमीवर भर..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली | प्रतिनिधी :- केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ ऐवजी लागू केलेल्या विकसित भारत आजीविका अधिनियम (ग्रामीण) २०२६ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायत दिभना येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे प्रमुख उपस्थित होते. तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे, तहसीलदार सागर कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी बेडके, सरपंच गुरनुले, ग्रामसेविका श्रीमती देशमुख, नायब तहसीलदार येरमे, तसेच तालुक्यातील नरेगा अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, महिला, मजूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मार्गदर्शन करताना गावात मोठ्या प्रमाणावर जल व मृदसंधारणाची शाश्वत कामे, सिंचन सुविधा निर्माण करणे आणि नव्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच या नव्या योजनेअंतर्गत १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी केंद्र शासनाने दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी मामा तलाव परिसरातील सर्व्हे क्रमांक १३५ येथे प्रत्यक्ष भूमिपूजन करून वृक्षारोपण केले व विकासकामांना प्रारंभ केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले, संचालन नायब तहसीलदार येरमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तहसीलदार सागर कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!