27 Jul 2026, Mon

गडचिरोली येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास मान्यता.. ३० दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार – जिल्हाधिकारी..

गडचिरोली, दि. ३ जुलै (जिमाका):- गडचिरोली येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालायाने अधिकृत मंजुरी दिली आहे. चालू शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून हे विद्यालय प्रत्यक्ष सुरू होणार असून, आगामी ३० दिवसाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून लवकरच इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनने याबाबतचा अधिकृत आदेश २ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. मार्च २०१९ मध्ये मंजुरी मिळालेल्या देशातील ५० नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी हे एक विद्यालय आहे.
तात्पुरत्या इमारतीत भरणार शाळा; जिल्हा प्रशासनाचे सहकार्य..
प्रायोजक प्राधिकरणाने विद्यालयासाठीची जागा केंद्रीय विद्यालय संघटनच्या नावे हस्तांतरित केली आहे. तसेच शाळेच्या तात्पुरत्या व्यवस्थापनासाठी इमारतही उपलब्ध करून दिली आहे. गडचिरोली येथील ‘शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, सेमाना बायपास रोड, येथे सध्या हे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू केले जात आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथे तात्पुरत्या निवासासाठी आणि वर्गखोल्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत काही खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत, यासाठी जिल्हा यंत्रणा पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहिली ते पाचवीचे वर्ग__
सुरुवातीला हे विद्यालय नागरी क्षेत्रांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत (प्रत्येक इयत्तेचा एक सेक्शन) सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग वाढवले जातील. जिल्हा यंत्रणेच्या संपूर्ण सहकार्याने प्रवेश प्रक्रिया आणि इतर कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जातील.

कायमस्वरूपी इमारतीचे कामही समांतरपणे होणार सुरू..
विद्यालयाच्या तात्पुरत्या इमारतीमध्ये वर्ग सुरू होत असतानाच, दुसरीकडे केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम देखील समांतरपणे सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी हक्काची भव्य इमारत मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आणि स्थानिक यंत्रणेच्या सकारात्मक व सहकार्यामुळे हा महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा वेळेत पार पडत असून, यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची दारे खुली होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!