28 Oct 2026, Wed
Breaking

१३ जुलै रोजी गडचिरोली येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा जिल्हास्तरीय भव्य मोर्चा..

१३ जुलै रोजी गडचिरोली येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा जिल्हास्तरीय भव्य मोर्चा..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. ८ जुलै :- अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशन (AIFAWH) यांच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १० जुलै २०२६ रोजी “काळा दिवस” पाळण्यात येत आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा जिल्हास्तरीय भव्य मोर्चा दि. १३ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेला ५० वर्षे पूर्ण होत असतानाही अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नियमित सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी (PF) यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. २०१८ पासून केंद्र सरकारने मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही. याशिवाय FRS, ई-केवायसी, पोषण ट्रॅकर, BLO, जनगणना, विविध सर्वेक्षणे व इतर योजनेबाह्य कामांचा वाढता बोजा कर्मचाऱ्यांवर टाकण्यात येत असून, त्याविरोधातही आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये नियमितीकरण, किमान वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटीची तातडीने अंमलबजावणी, ICDS ला स्वतंत्र विभागाचा दर्जा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, BLO कामाची सक्ती बंद करणे, पर्यवेक्षिका पदासाठी १०० टक्के भरती अंगणवाडी सेविकांमधून करणे, ‘लाडकी बहीण’ योजनेचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करणे तसेच सर्व अंगणवाड्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
या जिल्हास्तरीय आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे, कॉम्रेड अमोल मारकवार यांच्यासह छाया कागदेलवार, विटाबाई भट, सुनंदा बावणे, बबीता मडावी, मोनिका विस्वास, सुमन तोकलवार, माया शेडमाके, कुसुम नैताम, माया नैनुरवार, कविता कातकर, कविता सिडाम, करुणा दुर्वा, उज्वला उंदिरवाडे, योगीता मुनघाटे व जयश्री शेरेकर हे करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू), गडचिरोली जिल्हा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
– अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू), गडचिरोली जिल्हा कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!