अस्मिता जयेश जिलठे (सहायक अभियंता, जलसंपदा विभाग) व जयेश जिलठे (प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबॅग उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
कुरखेडा, दि.०७/०७/२०२६ :- बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा संचालित आव्हान हायस्कूल, आंधळी फाटा येथे इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबॅग वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमासाठी अस्मिता जयेश जिलठे (सहायक अभियंता, जलसंपदा विभाग) व जयेश जिलठे (प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबॅग उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात त्यांच्या या उदात्त कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृपाल मेश्राम, सचिव, बहुजन हिताय शिक्षण संस्था कुरखेडा, प्रियंका मेश्राम कोषाध्यक्ष बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. विनोद नागपुरे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला एक भावनिक व आनंददायी क्षण लाभला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जे. आर. म्हस्के सर यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पाहुण्यांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच जे. आर. म्हस्के सर हे दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ, समर्पित व उल्लेखनीय सेवेला गौरव देण्यासाठी त्यांचा व त्यांच्या धर्मपत्नींचा सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक डी. के. सोनवाने, जे. आर. म्हस्के, के. सी. मेश्राम, चारुलता वालदे-मेंडम, सुनीता कवडो-मेंडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी निखिल डॉलिकर (लिपिक), प्रकाशजी हजारे (प्रयोगशाळा परिचर), तुषार फुले, अभिषेक राऊत व शुभम लांजेवार उपस्थित होते.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले.
बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा ही संस्था मागील तीन वर्षांपासून शासनाची कोणतीही विशेष आर्थिक मदत न घेता आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सेवा, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश, मोफत शैक्षणिक साहित्य, मोफत स्कूलबॅग तसेच विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवत असून, या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

