रात्रीच्या आरोग्य सेवेची तत्परता, औषधसाठा, मलेरिया निदान किट्स व नोंदींची केली प्रत्यक्ष पडताळणी
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे
गडचिरोली, दि. ९ (जिमाका) :- ग्रामीण भागातील नागरिकांना चोवीस तास दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बुधवारी मध्यरात्री गडचिरोलीजवळील चातगाव आरोग्य उपकेंद्राला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट देऊन सखोल पाहणी केली.
या अचानक भेटीचा मुख्य उद्देश रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा किती तत्परतेने प्रतिसाद देते, उपलब्ध सुविधा कार्यरत आहेत का आणि नागरिकांना वेळेत उपचार मिळतात का, याची प्रत्यक्ष पडताळणी करणे हा होता. पाहणीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत उपकेंद्रातील विविध सेवा व नोंदींची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी उपचारासाठी आलेल्या एका जोडप्याशी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत विचारपूस केली. तसेच रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येत नसल्याची खात्री करून घेतली.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य व साथीच्या आजारांचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपकेंद्रातील औषधसाठ्याची सविस्तर तपासणी करण्यात आली. ताप, अतिसार, सर्दी, मलेरिया आदी आजारांवरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, याची खात्री करण्यात आली. तसेच मलेरिया निदानासाठी आवश्यक असलेल्या आरडीके (RDK) किट्सची उपलब्धता, त्यांचा साठा व वापराची तयारी याचीही बारकाईने पाहणी करण्यात आली.
याशिवाय उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या, सेवा वितरणाची कार्यपद्धती, उपलब्ध मनुष्यबळ, विविध शासकीय नोंदवही, रजिस्टर, रेकॉर्ड बुक्स व इतर दप्तर अद्ययावत ठेवण्यात आले आहे की नाही, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. आवश्यक नोंदी नियमित व अद्ययावत ठेवण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी अशा अचानक तपासण्या पुढील काळातही सातत्याने सुरू राहतील, असे सांगितले.
प्रशासनाच्या या मध्यरात्रीच्या पाहणीमुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अधिक भर देण्यात येत असून, नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

