12 Sep 2026, Sat

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चांदाळा जंगलात हत्तीच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू..

🚨 ब्रेकिंग न्यूज | गडचिरोली..

सेल्फीचा मोह जीवावर बेतला; चांदाळा जंगलात हत्तीच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू..

न्यू विदर्भ केसरी | फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, प्रतिनिधी :- गडचिरोली शहरालगतच्या चांदाळा जंगल परिसरात रानटी हत्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असताना, सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हत्तीच्या अचानक झालेल्या हल्ल्यात धनराज पुंजीराम मडावी (रा. मेंढा, चांदाळा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, परिसरात हत्ती फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक नागरिक त्याला पाहण्यासाठी आणि मोबाईलवर छायाचित्रे तसेच सेल्फी घेण्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. याच वेळी धनराज मडावी हे हत्तीच्या अतिशय जवळ गेले. काही क्षणांतच हत्तीने आक्रमक होत त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

दरम्यान, वन विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा इशारा देत रानटी हत्ती किंवा इतर वन्यप्राण्यांच्या जवळ जाऊन फोटो अथवा सेल्फी काढू नये, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. वन्यप्राण्यांना चिथावणी देणे किंवा त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणे जीवघेणे ठरू शकते, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!