12 Sep 2026, Sat

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पिक विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी : कृषी विभाग.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, (जिमाका):- यंदाच्या खरीप हंगामात एल निनो प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील धानासह इतर खरीप पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने सहभागी होऊन आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या हवामानातील अनिश्चिततेमुळे नैसर्गिक संकटांचा धोका वाढतो. अशा वेळी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रभावीपणे राबविली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन संभाव्य आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. योजनेअंतर्गत पावसातील खंड, पूर, दुष्काळ, भूस्खलन, वीज कोसळणे तसेच कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक सुरक्षा कवच ठरत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकरी आपल्या पिकाचा विमा विविध माध्यमांतून भरू शकतात. गावातील किंवा जवळील सामाईक सेवा केंद्र (CSC) येथे जाऊन, संबंधित बँक शाखेमार्फत, तसेच शासनाच्या अधिकृत PMFBY पोर्टल किंवा Crop Insurance App च्या माध्यमातूनही ऑनलाइन नोंदणी करता येते. एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि बदलत्या हवामानाचा विचार करता कोणताही धोका न पत्करता प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!