28 Oct 2026, Wed
Breaking

गडचिरोलीत जिल्हास्तरीय ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा..

तरुण पिढीने छोटे व सुदृढ कुटुंब अंगीकारावे: अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके..

नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी रांगोळीतून रेखाटले वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली,(जिमाका)११:- सार्वजनिक आरोग्य विभाग, गडचिरोलीच्या समन्वयाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जिल्हास्तरीय उद्घाटन व शुभारंभ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. छाया उईके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी मा. डॉ. माधव शिंदे, क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. नीलकंठ मसराम, बालरोगतज्ज्ञ (वर्ग-१) डॉ. प्रशांत पेंदाम आणि सहाय्यक अधिसेविका श्रीमती कविता पोतरोजवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
रांगोळीतून लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांवर प्रकाश___
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी काढलेली उत्कृष्ट रांगोळी ठरली. नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी आपल्या कलागुणांचा वापर करून रांगोळीच्या माध्यमातून वाढत्या लोकसंख्येचे विदारक चित्र आणि त्याचे दुष्परिणाम अतिशय प्रभावीपणे रेखाटले. या कलाकृतीचे उपस्थितांनी व मान्यवरांनी कौतुक केले.
कुटुंब नियोजनाशिवाय पर्याय नाही: डॉ. छाया उईके__
उद्घाटक डॉ. छाया उईके यांनी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. “तरुण पिढीने पुढाकार घेऊन छोटे आणि सुदृढ कुटुंब अंगीकारले पाहिजे, त्यासाठी कुटुंब नियोजन शिवाय पर्याय नाही,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
दोन मुलांमध्ये अंतर ठेवण्याबाबत जनजागृती व्हावी: डॉ. माधुरी किलनाके___
प्रमुख पाहुण्या डॉ. माधुरी किलनाके यांनी समाजातील आरोग्य घटकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. आशा ताई आणि ए.एन.एम. (ANM) यांनी गृहभेटीदरम्यान दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने होणारे फायदे आणि उपलब्ध साधनांची माहिती देऊन समाजात व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ (लोकसंख्येचा लाभांश) म्हणजे देशाचा सुवर्णकाळ: डॉ. माधव शिंदे.__
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांनी ‘लोकसंख्या लाभांश’ (Demographic Dividend) या संकल्पनेवर अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली. ते म्हणाले, “जेव्हा देशात कमावणाऱ्यांची (१५ ते ६४ वयोगट) संख्या जास्त आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे वृद्ध व मुलांची संख्या कमी असते, त्याला लोकसंख्येचा सुवर्णकाळ म्हणतात. भारताचा हा सुवर्णकाळ २००५ ते २०५५ पर्यंत असून, याचा सर्वोच्च टप्पा २०३०-२०३५ दरम्यान असेल.”

महाराष्ट्रात ६५% पेक्षा जास्त लोकसंख्या या वयोगटात असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, “गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात तरुण लोकसंख्या भरपूर आहे, परंतु या तरुणांना योग्य कौशल्याची (Skills) गरज आहे. जर आपण तरुणांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि नोकऱ्या दिल्या, तरच या लाभांशाचे देशाच्या विकासात रूपांतर होईल. अन्यथा, ही संधी गमावल्यास बेरोजगारी वाढून याचे रूपांतर मोठ्या संकटात (Demographic Disaster) होऊ शकते.”
उपस्थिती आणि आभार___
या जिल्हास्तरीय सोहळ्याला रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी, परिसेविका, अधिपरिचारिका, बेबी वड्डे (जि.प. गडचिरोली), आशा ताई, नर्सिंग ट्यूटर, प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके संचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्रीमती प्रतिज्ञा रामटेके (पी.एच.एन.) यांनी केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

error: Content is protected !!