जिल्हाधिकाऱ्यांचे पालकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, (जिमाका) दि.२० :- गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवीमधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह विहित कालावधीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
विद्यालय प्रशासनाच्या माहितीनुसार, १७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यालयाच्या कार्यालयात केवळ ऑफलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रवेश अर्ज विद्यालयातून विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच हे निवासी विद्यालय नसून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत ये-जा करून शिक्षण घ्यावे लागणार आहे, याची पालकांनी नोंद घ्यावी.
प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ मार्च २०२६ रोजीच्या वयानुसार निश्चित करण्यात आली असून, प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेच्या नियमावलीनुसार राबविण्यात येणार आहे. शिक्षणाचा हक्क (RTE), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी (एनसीएल), दिव्यांग तसेच एकुलती एक मुलगी यांच्यासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या तरतुदींचे पालन करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, रिक्त जागांचा तपशील व मार्गदर्शक सूचना विद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत लिंक तसेच विद्यालयाच्या सूचना फलकावर पाहता येतील. अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी केंद्रीय विद्यालय, सेमना बायपास, आनंदनगर, गडचिरोली येथे संपर्क साधावा किंवा ०७१३२-२२३०२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

