13 Sep 2026, Sun

“उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू” ; आरोग्य विभागाचा खुलासा..

विषप्राशन प्रकरणात आरोग्य यंत्रणेचा तत्काळ प्रतिसाद ;

उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू ; आरोग्य विभागाचा खुलासा.

न्यू विदर्भ केसरी & जिल्हा गर्जना न्यूज / फुलचंद वाघाडे

गडचिरोली दि.05:- कांदोळी (प्रा. आ. केंद्र बुर्गी) येथील २३ वर्षीय महिलेच्या विषप्राशनामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने वस्तुस्थितीदर्शक प्राथमिक खुलासा केला असून, उपलब्ध यंत्रणेद्वारे तात्काळ उपचार व संदर्भ प्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दिनांक ४ मे २०२६ रोजी कांदोळी येथील संबंधित महिलेने ऑर्गॅनोफॉस्फरस (OP) विषप्राशन केल्याची घटना घडली. घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी कांदोळी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) बुर्गी यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा संपर्क साधलेला नव्हता. त्यांनी परस्पर दुचाकीवरून रुग्णास बुर्गी येथे नेण्याचा निर्णय घेतला. सदर रुग्ण सकाळी १०.५० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, बुर्गी येथे दाखल झाला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी येथील रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे पाठविण्यात आले. त्या वेळी रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने पर्यायी व्यवस्था करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे उपचार सुरू असताना विषबाधेची तीव्रता अधिक असल्यामुळे काही वेळातच संबंधित महिलेचा मृत्यू झाला. सदर प्रकरणात आरोग्य विभागाने उपलब्ध संसाधनांच्या आधारे तत्काळ प्रतिसाद देत रुग्णाला योग्य वेळी संदर्भित केले होते. नातेवाईकांनी सुरुवातीस आरोग्य केंद्राशी संपर्क न साधता दुचाकीचा वापर करून रुग्ण नेल्यामुळे प्रारंभी विलंब झाला असला, तरी आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर पुढील संपूर्ण प्रवास शासकीय रुग्णवाहिकेद्वारेच करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!