10 Jun 2026, Wed

मुख्यमंत्र्यांच्या ‘स्टील सिटी’त आरोग्य व्यवस्था खिळखिळी! गंभीर रुग्णाला १७ तास डॉक्टरांची प्रतीक्षा; गरिबांची होरपळ..

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा वॉर्डातील विदारक दृश्य ; वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचे हाल..

न्यू विदर्भ केसरी & जिल्हा गर्जना न्यूज..

गडचिरोली :- मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे स्वप्न दाखवत असतानाच, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था मात्र गंजलेल्या लोखंडासारखी खिळखिळी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल होतील, अशी अपेक्षा सामान्यांना होती, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच ‘अत्यवस्थ’ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गंभीर आजारी रुग्णांना दहा-दहा तास ताटकळत ठेवले जात असून, कोट्यवधींच्या यंत्रसामग्रीची केवळ ‘चमकोगिरी’ सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार पणाचा कळस ट्रामा (इमर्जन्सी) वॉर्डात पाहायला मिळाला. सितकुरा धर्मा जराते (बेड नं. ५) या रुग्णाला लघवीचा त्रास होत असल्याने ३ मे रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास दाखल करण्यात आले होते. रुग्णाला असह्य वेदना होत असल्याने डॉक्टरांनी लघवीसाठी नळी टाकली, मात्र ती नळी आत अडकल्याने परिस्थिती गंभीर झाली. कर्तव्यदक्षता म्हणून उपस्थित डॉक्टरांनी रात्री ९:३० वाजता शल्यचिकित्सकांना (सर्जन) तातडीचा ‘इमर्जन्सी कॉल’ दिला. मात्र, या आपत्कालीन बोलावण्याला केराची टोपली दाखवली. रात्रभर तो रुग्ण वेदनेने विव्हळत होता, पण संबंधित डॉक्टर फिरकले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता, म्हणजे तब्बल १७ तासांनंतर या रुग्णाची दखल घेण्यात आली. हे केवळ एक उदाहरण नसून, जिल्हा रुग्णालयातील ही रोजचीच व्यथा आहे.
जिल्ह्यात लोकप्रतिनिधींचा मोठा राबता आहे. खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार रामदास मसराम यांसारख्या नेत्यांचा लवाजमा असतानाही आरोग्य व्यवस्था सुधारण्यात कोणालाही रस नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार डॉ. मिलिंद नरोटे हे स्वतः डॉक्टर आहेत, तसेच माजी आमदार डॉ. देवराव होळी आणि डॉ. नामदेव उसेंडी हे देखील सत्ताधारी वर्तुळात सक्रिय असलेले डॉक्टर-नेते आहेत. वैद्यकीय क्षेत्राची जाण असलेल्या या नेत्यांच्या डोळ्यांदेखत गरिबांचे हाल होत आहेत, हे जिल्ह्याचे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
मुख्यमंत्री जिल्ह्यात येतात आणि उद्योगांच्या मोठ्या घोषणा करतात, मात्र ज्या सामान्य जनतेच्या जिवावर हे उद्योग उभे राहणार आहेत, त्यांच्या आरोग्याविषयी प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे. जिल्हा मुख्यालयात जर रुग्णांना १७-१७ तास डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागत असेल, तर अहेरी, भामरागड किंवा सिरोंचा यांसारख्या दुर्गम भागातील स्थितीची कल्पना न केलेलीच बरी. माध्यमांनी असे प्रश्न उपस्थित केल्यावर अधिकारी केवळ तांत्रिक बाजू मांडून आपली पाठ थोपटून घेतात, पण वेळेवर उपचार न मिळाल्याने दररोज किती गरिबांना प्राण गमवावे लागतात, याचे उत्तर कोणाकडेही नाही. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या ‘स्टील सिटी’त गरिबांना आरोग्य मिळवण्यासाठी अजून किती काळ ‘वेटिंग’वर राहावे लागणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!