28 Jul 2026, Tue

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी औषधांचा ‘बफर स्टॉक’ तयार ठेवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश..

गडचिरोली :- पावसाळ्याच्या काळात दुर्गम व संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये कोणतीही आरोग्य आपत्ती उद्भवू नये यासाठी आवश्यक औषधांचा ‘बफर स्टॉक’ (साठा) पूर्वतयारीत ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हा हिवताप नियंत्रण अंमलबजावणी समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत ताप, वेदनाशामक औषधे, पॅरासिटामॉल, तसेच जलजन्य आजारांवरील औषधे उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. ओआरएस पाकिटे, झिंक टॅब्लेट, जुलाब थांबविणारी औषधे यांचा पुरेसा साठा ठेवावा. सर्पदंश व विंचूदंशाच्या घटनांसाठी अँटी-स्नेक व्हेनम (ASV) आणि अँटी-स्कॉर्पिअन व्हेनम उपलब्ध ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला.दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठीही नियोजन आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची किमान सहा महिन्यांची औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइडसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडरचा साठा ठेवावा तसेच घराघरात क्लोरिन टॅब्लेटचे वितरण करावे, असेही त्यांनी सांगितले.

ज्या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहतील याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार शाळा किंवा समाजमंदिरात तात्पुरती आरोग्य चौकी उभारण्याचे नियोजन करावे. गर्भवती महिलांची विशेष काळजी घेत पावसाळ्यात प्रसूती अपेक्षित असलेल्या महिलांना वेळेपूर्वीच जवळच्या ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचे ‘वेटिंग रूम/डोली सेंटर’ नियोजन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी धूर फवारणी, साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन यावर भर देण्यात यावा. साथीच्या आजारांची लक्षणे आढळताच तत्काळ ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ (RRT) तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच औषध साठा करताना मुदत संपण्याची तारीख तपासूनच साठवणूक करावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजाता वाढीवे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!