10 Jun 2026, Wed

गडचिरोलीत थॅलेसेमिया डे – केअर सेंटरचे लोकार्पण ; रुग्णांशी जिल्हा शल्य चिकित्सकांचा थेट संवाद.

गडचिरोली :- जिल्ह्यातील थॅलेसेमिया ग्रस्त बालकांना आणि रुग्णांना वेळेवर उपचार व रक्त संक्रमण सुलभ व्हावे, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नूतन ‘थॅलेसेमिया डे-केअर सेंटर’ चे उद्घाटन करण्यात आले. थॅलेसेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आयोजित या उपक्रमात आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, डॉ. बागराज धुर्वे आणि रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन (संवाद):

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे__रुग्णांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, “थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी हे डे-केअर सेंटर एक आधारवड ठरेल. केवळ उपचार करणे हा आमचा उद्देश नसून, रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना मानसिक बळ देणे महत्त्वाचे आहे. रक्ताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा रुग्णालय कटिबद्ध आहे. पालकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी व उपचार घ्यावेत.”

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके__ त्यांनी मार्गदर्शनात सांगितले की, “थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी किंवा गर्भधारणेदरम्यान योग्य तपासणी करणे (Screening) आवश्यक आहे. जनजागृती हाच या आजारावरील खरा प्रतिबंध आहे. आज सुरू झालेले हे डे-केअर सेंटर अद्ययावत सुविधांनी सज्ज असून, रुग्णांना इथे घरगुती वातावरणात उपचार मिळतील याची आम्ही काळजी घेत आहोत.”

कार्यक्रमाचे स्वरूप___ कार्यक्रमादरम्यान डॉ. बागराज धुर्वे यांनी थॅलेसेमिया व्यवस्थापनातील तांत्रिक बाबी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. या सेंटरमुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी इतर मोठ्या शहरांत जाण्याची गरज भासणार नाही. डे-केअर सेंटरमध्ये रक्ताधान (Blood Transfusion) सोबतच रुग्णांच्या समुपदेशनावरही भर दिला जाणार आहे.

(डॉ. वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली)..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!