गडचिरोली जिल्ह्यात २,४५६ रुग्णांना ‘पॅलिएटिव्ह केअर’ चा आधार!
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, 06:- गडचिरोली जिल्ह्यातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना वेदनामुक्त जीवन जगता यावे आणि त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुधारावा, यासाठी मा ना प्रकाशजी आबिटकर आरोग्य मंत्री यांचे संकल्पनेतून आरोग्य विभागामार्फत ‘ पॅलिएटिव्ह केअर प्रोग्राम’ प्रभावीपणे राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २,४५६ रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना विविध स्तरावर वैद्यकीय सेवा व मानसिक आधार दिला जात आहे.
सांख्यिकी आढावा:-
१२ ब्लॉक्समध्ये आरोग्य सेवेचे जाळे__ जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत रुग्णांचे त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २४६ रुग्ण ‘अति उच्च’ (High Need) श्रेणीत असून, ९८२ रुग्ण मध्यम तर १,२२८ रुग्ण कमी गरजेच्या श्रेणीत आहेत.
तालुका निहाय स्थिती:–
गडचिरोली ब्लॉक: ३४८
चामोर्शी ब्लॉक: अति उच्च गरज असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक (८९) असून येथे विशेष वैद्यकीय पथक तैनात आहे.
इतर तालुके: धानोरा (३१९), कुरखेडा (२३८) आणि एटापल्ली (२२०) या विभागांमध्येही रुग्ण मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत.
काय आहे पॅलिएटिव्ह केअर?
कर्करोग, किडनी निकामी होणे, अर्धांगवायू किंवा शेवटच्या टप्प्यातील हृदयविकार अशा असाध्य आजारांमुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. अशा रुग्णांच्या वेदनांचे व्यवस्थापन करणे, त्यांना योग्य आहार-विहाराचा सल्ला देणे आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सन्मानाने जगता यावे, ही या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
जिल्हा प्रशासनाचे प्रतिपादन:-
“रुग्णांच्या आयुष्यातील सायंकाळ सुखद करण्याचा आमचा प्रयत्न” “पॅलिएटिव्ह केअर म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर ती एक माणुसकीची सेवा आहे. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी आम्ही त्यांना त्यांच्या घरातच आधार देण्याचा प्रयत्न करत आहोत. दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत ही सेवा पोहोचवण्यासाठी आमचे पथक कटिबद्ध आहे.”
डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली__
प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनामूल्य पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध”
“पॅलिएटिव्ह केअर प्रोग्रामच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांचे जीवन सुसह्य करणे हा आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही ‘होम बेस्ड केअर’ म्हणजेच गृहभेटी देऊन उपचार करण्यावर विशेष भर देत आहोत. यासाठी आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मिळणारी सर्व औषधे आणि समुपदेशन सेवा शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत, ज्याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.”
डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली..
तज्ञ सेवांचे सक्षमीकरण__
जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील गंभीर आजारी रुग्णांना केवळ रुग्णालयातच नव्हे, तर आवश्यकतेनुसार त्यांच्या घरी जाऊनही सेवा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
: आवाहन :
गरजू रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून या मोफत रुग्णसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
प्रसिद्धीसाठी सादर.
जिल्हा माहिती व जनसंपर्क कक्ष,आरोग्य विभाग, गडचिरोली.

