जिल्हा रुग्णालयाचा पुढाकार ; थॅलेसेमिया मुक्तीसाठी आरोग्य प्रशासनाचे आवाहन..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली :- जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे थॅलेसेमिया आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटूळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (फिजीशियन) डॉ. नागदेवते प्रामुख्याने उपस्थित होते.
जनजागृती रॅलीचे स्वरूप:__
जिल्हा रुग्णालय परिसर आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून थॅलेसेमिया प्रतिबंध, लग्नापूर्वी रक्ताची तपासणी (Screening) आणि थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी नियमित रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी हातात घोषणांचे फलक घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
आरोग्य प्रशासनाचा संदेश:__
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी यावेळी सांगितले की, “थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार असून योग्य काळजी आणि जनजागृतीद्वारे आपण याचा प्रसार रोखू शकतो. रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रुग्णालय कटिबद्ध आहे.”
डॉ. संतोष कोटूळे व डॉ. प्रफुल्ल हुलके यांनीही थॅलेसेमिया टाळण्यासाठी लग्नापूर्वी ‘HbA2’ तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. नागदेवते यांनी या आजारातील तांत्रिक उपचार आणि खबरदारीच्या उपायांवर प्रकाश टाकला.
या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, मेट्रन, नर्सिंग ट्यूटर, परिचारिका, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कार्यालय आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
:सौजन्य:
जिल्हा शल्य चिकित्सक,
सामान्य रुग्णालय, गडचिरोली.

