10 Jun 2026, Wed

कोरची आश्रमशाळेचा दहावीला ८४.०९ टक्के निकाल..

वडिलांच्या निधनानंतरही मिनाक्षी खोबा ठरली शाळेत प्रथम ; आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम..

फुलचंद वाघाडे / न्यू विदर्भ केसरी..

कोरची:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोरचीने दहावीच्या शालांत परीक्षा २०२६ मध्ये पुन्हा एकदा उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत ८४.०९ टक्के निकालाची नोंद केली आहे. गेल्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणाऱ्या या शाळेने यंदाही दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

यावर्षी शाळेतून एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये कु. मिनाक्षी खोबा हिने ७३.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. दक्ष उसेंडी याने ७०.८० टक्के गुणांसह द्वितीय तर कु. पुष्पा मडावी हिने ७० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच वंदना बागडेहरिया (६९.२०%), आशिष निर्मलकर (६८.२०%) आणि सोनाली कोरेटी (६६.४०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची गौरवशाली परंपरा पुढे नेली. परीक्षेत १३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

विशेष म्हणजे प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मिनाक्षी खोबा हिच्यावर यावर्षी मोठे दुःख कोसळले होते. तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असतानाही तिने खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि नियमित अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. “गुरुजनांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, कुटुंबीयांचे सहकार्य आणि नियोजनबद्ध अभ्यास यामुळेच हे यश मिळाले,” असे सांगताना मिनाक्षी भावूक झाली. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षणाद्वारे मोठे अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. विद्यार्थिनीच्या या संघर्षमय यशाची दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह तिच्या घरी जाऊन सत्कार केला. या प्रसंगी गावकऱ्यांनीही मिनाक्षीच्या जिद्दीचे कौतुक केले.

या यशामागे अप्पर आयुक्त मा. आयुषी सिंह (नागपूर), प्रकल्प अधिकारी मा. अरुण एम., सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) वैद शेख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभुजी सादमवार आणि नरेंद्र कावळे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली. मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालाल उईके, मुख्याध्यापक उमाकांत ढोक, दहावीचे वर्गशिक्षक गुरुराज मेढे तसेच भैयालाल कुरसंगे, कुणाल गोवर्धन, सुमन अडभैया, संतोष सहारे, नैना येंगलवार, अमित मेश्राम, अधीक्षिका सीमा कुरेकार, गीता राऊत, धनश्री परतेती, डाकराम ठाकरे आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. कोरचीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवत विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेणारी आश्रम शाळा कोरची ही खऱ्या अर्थाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी “वरदान” ठरत असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत असून, संपूर्ण भागात आनंद व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!