10 Jun 2026, Wed

“उद्योगात प्रत्यक्ष कामाची तरुणांना संधी”

पंतप्रधान इंटर्नशीप योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत “ पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची “ घोषणा केलेली आहे.सन 2026 -27 मध्ये या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून, देशभरात ३१ हजार ४८० तरुणांना कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, वाहननिर्मिती, औषधनिर्माण, उत्पादन, माध्यम, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यप्रशिक्षण उपलब्ध आहे.या कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ६ ते ९ महिने असून, प्रशिक्षणार्थींना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

या योजनेंतर्गत १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांची शैक्षणिक पात्रता दहावीपासून बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशी असावी.

पूर्ण वेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेसाठी अपात्र ठरतील. मात्र ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवार योजनेसाठी पात्र आहेत.

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय संकुल बॅरेक क्र.-2 युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालयासमोर गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!