Lमहाराष्ट्रासह देशभरातील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग ; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती_
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
नवी दिल्ली, दि. २४ मे २०२६ :- आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे जतन, संवर्धन तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी नवी दिल्ली येथील लाल किल्ला मैदानावर रविवारी भव्य ‘जनजाती सांस्कृतिक समागम’ (महासंगम) आयोजित करण्यात आला. देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीने हा महासंगम ऐतिहासिक ठरला. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमीन या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन जनजाती सुरक्षा मंच,जनजाती जागृती समिती च्या वतीने करण्यात आले होते. देशभरातील विविध जनजाती समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व जनप्रतिनिधी या महासंगमात सहभागी झाले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती__
या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते तसेच गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या संवैधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पारंपरिक संस्कृतीचा अनोखा जल्लोष__ महासंगमाच्या प्रारंभी दिल्लीच्या रस्त्यांवर आदिवासी संस्कृतीचे वैभव दर्शविणारी भव्य रॅली काढण्यात आली. महाराष्ट्रातील नंदुरबारसह विविध जिल्ह्यांतील आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मोठ्या गजरात, पारंपरिक ढोल-ताशे, लोकनृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके आणि माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः पारंपरिक ढोल वाजवत समाजबांधवांसोबत सहभाग नोंदविला. त्यामुळे उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.
हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुट__ भव्य मंडपात आयोजित मुख्य सभेमध्ये हजारो आदिवासी बांधवांनी जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याची शपथ घेतली. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अमूल्य ओळख असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. “आदिवासी समाजाचा सन्मान, त्यांचे अधिकार आणि न्याय यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. देशभरातील जनजाती समाजाच्या अभूतपूर्व सहभागामुळे हा महासंगम आदिवासी ऐक्य, सांस्कृतिक अभिमान आणि हक्कांच्या लढ्याचा एक ऐतिहासिक टप्पा ठरला. उत्साहपूर्ण वातावरणात आणि समाज एकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

