10 Jun 2026, Wed

गुरुकुलच्या 175 पोलीस गुणवंतांचा भव्य जाहीर सत्कार !!

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली :- स्थानिक गडचिरोली शहरातील कमल केशव सभागृहात गुरुकुल अकॅडमीच्या 2026 च्या भरतीमध्ये गडचिरोली पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या तब्बल 175 गुणवंतांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. सलग तिसऱ्या वर्षी गुरुकुल अकॅडमीने गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत सर्वाधिक निकाल देऊन हॅट्रिक नोंदवली हे विशेष.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. राजेश कात्रटवार मा.बांधकाम सभापती न.प गडचिरोली हे होते तर अध्यक्षस्थानी गुरुकुल अकॅडमी चे संचालक तथा मार्गदर्शक पुष्पक सेलोकर हे होते.
यावेळेस मंचावर प्रमुख अतिथी म्हणून युवा वक्ते तथा लेखक तुषार दुधबावरे , शैलेश खरवडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व सेलोकर मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंतांनी यश डोक्यावर न घेता,
यश पचवून आपल्या पदाचा, आपल्या जवाबदारीचा सामान्य नागरिकांना कसा उपयोग होईल, आपल्याला आपल्या खाकीची गरिमा अबाधित कस ठेवता येईल या बाबींचा विचार करून आपल्याला आपलं कर्तव्य बजावायचं आहे असे मनोगत त्यांनी उद्घाटनीय भाषणात व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले युवा व्याख्याते व लेखक तुषार दुधबावरे यांनी ‘गडचिरोली पोलीस यंत्रणा हे केवळ नागपूर परिक्षेत्रातील वा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशामधील अव्वल पोलीस दल म्हणून संपूर्ण देशात नावारूपास आहे. गडचिरोली पोलीस दलातील अनेक साहसी अधिकारी आणि जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे。त्यांच्या या बलिदानामुळेच गडचिरोली जिल्हा आज शांततेकडे आणि विकासाकडे वाटचाल करत आहे बंदुकीच्या आवाजापेक्षा आज दुर्गम भागात विकासाची नवी पहाट होत आहे。गडचिरोली जिल्हा पोलिस आणि सी60 जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय साहस दाखवून नक्षलवाद्यांच्या कारवाया मोडून काढल्या आहेत.
वर्षानुवर्षे नक्षलवाद्यांच्या भीतीने गप्प बसलेला आदिवासी समाज हळूहळू सरकारकडे विश्वासाने बघू लागल्याचे आपण बघत आहोत असे ते व्यक्त झाले. गुरुकुलचे मार्गदर्शक शैलेश खरवडे यांनी पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या गुणवंतांनी इथवरच थांबू नये तर विविध शाखांमध्ये पदवी,पदव्युत्तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणात भर टाकायला हवी असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अकॅडमी चे संचालक पुष्पक सेलोकर यांनी मागील सलग तीन वर्षांपासून गुरुकुल अकॅडमी सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे ही खरोखरच गुरुकुल साठी अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गुरुकुल अकॅडमी 2026 च्या प्रशिक्षण बॅच मध्ये बादल राजेंद्र गावतुरे पुरुष गटातून जिल्ह्यात प्रथम तर महिला गटामधून अमिषा कोवे जिल्ह्यात द्वितीय, शितल देशमुख जिल्ह्यात तृतीय, कोकिळा भोयर जिल्ह्यात तृतीय, अमिषा घाटूरकर चतुर्थ तर तराना नैताम जिल्ह्यात महिला गटात पाचवी आणि पल्लवी कुमरे, नूतन कुमरे, अश्विनी कुमरे या एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींची गडचिरोली पोलीस दलात निवड झाली. मंचावरील मान्यवरांनी सर्व निवड पोलीस शिपाई पदी निवड झालेल्या शुभेच्छा देऊन सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
अकॅडमीचे शारीरिक शिक्षक साहिल सोनटक्के तसेच उज्वल मेश्राम आकाश खोब्रागडे व त्यांचा ग्रुप यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!