चामोर्शीत वारंवार वीजपुरवठा खंडित; स्वाभिमानी सामाजिक संघटनेचे महावितरणला निवेदन..
न्यू विदर्भ केसरी प्रतिनिधी चामोर्शी..
चामोर्शी :- चामोर्शी शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, व्यापारी व लघु व्यावसायिक त्रस्त झाले असून या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्वाभिमानी सामाजिक संघटना, चामोर्शी यांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी शहरात गेल्या काही वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शहरातील १३२ केव्ही सबस्टेशन कार्यान्वित होण्यास विलंब होत असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष कामाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
तसेच, डीपीडीसी निधीतून सुरू करण्यात आलेली कामे अद्याप पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी, लघु उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असलेल्या चामोर्शीतील वीज समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष राजू बी. घोडरे यांची स्वाक्षरी असून चामोर्शीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपस्थित,मदन मडावी, दिवाकर कोहळे, पुराण व्याहार्डकर, विजय गेडाम,बाळू दुधबवरे अरुण गव्हरे, संगीता भांडेकर, साधना नैताम, सुरेखा सोनटक्के, शुक्राबाई पालकर, इंदुबाई बारसाकडे, जयश्री नैताम, लीलाबाई भांडेकर, मंदाबाई पालकर, विमलबाई पालकर,सयाबाई पिपरे,सुनंदा सोनटक्के, नागुबाई सोनटक्के, ताराबाई नैताम,लीलाबाई सोनटक्के,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका उपप्रमुख विक्की वालदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम संपर्क प्रमुख राजू राऊत व नागरिक उपस्थित होते.

