10 Jun 2026, Wed

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…

पाणी टंचाईवर शहरवासीयांना मोठा दिलासा ; नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. ३ जून :- गडचिरोली शहरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाढत्या उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरवासीयांच्या पाणीप्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. केवळ निवेदनापुरते न थांबता मागील सहा दिवसांपासून प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत गोसेखुर्द धरण प्रकल्पातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी त्यांनी ठामपणे मांडली. शहरातील नागरिकांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता नगराध्यक्षांनी अधोरेखित केली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून दि. ३ जून रोजी सकाळी ७ वाजता गोसेखुर्द धरण प्रकल्पातून वैनगंगा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वैनगंगा नदीतील पाणीसाठ्यात वाढ होणार असून शहरातील पाणी उपसा प्रक्रिया अधिक सक्षम होईल. परिणामी दि. ४ जूनपासून गडचिरोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या यशस्वी पाठपुराव्यानंतर नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करत शहरवासीयांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाशी समन्वय साधून भविष्यातही तत्परतेने काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या सक्रिय व लोकाभिमुख भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!