24 Jun 2026, Wed

अवैध रेती तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करा– आजाद समाज पार्टीची मागणी..

चामोर्शी तहसिलचे तहसीलदार यांना निलंबित करा:- आजाद समाज पार्टीची मागणी..

न्यू विदर्भ केसरी मुख्य संपादक..
NewVidarbhakesari.com

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यात शासनाने घालून दिलेल्या बंदी कालावधीतही मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून चामोर्शी तहसीलदारांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण-2025 तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अंतर्गत रेती उत्खनन व वाहतुकीसंदर्भात स्पष्ट नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार दरवर्षी १० जून ते ३० सप्टेंबर या पावसाळी कालावधीत रेतीघाटांवरून रेती उत्खनन व वाहतूक करण्यास बंदी असते. हा कालावधी पर्यावरणीय संरक्षण, नदीपात्रांचे संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि पूरस्थितीत मानवी जीवितास धोका टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चामोर्शी तालुक्यातील वेलतूर रेतीघाटावरून पोकलंड मशिनच्या सहाय्याने ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भातील फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे उपलब्ध असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या अवैध प्रकाराची माहिती महसूल विभागातील संबंधित कर्मचारी, स्थानिक प्रशासन तसेच ग्रामस्तरावरील जबाबदार यंत्रणांना असूनही कोणतीही प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असून, प्रशासनातील काही घटकांच्या संरक्षणाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती तस्करी होणे शक्य नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
आजाद समाज पार्टीने पुढे असेही नमूद केले आहे की, वाघोली, बोरघाट, कन्होली, जयरामपूर आदी रेतीघाटांवरील अवैध रेती उत्खननाबाबत यापूर्वीही चामोर्शी तहसीलदारांना लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या. तसेच अनेक वेळा दूरध्वनीद्वारेही माहिती देण्यात आली होती. मात्र, या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती तक्रारदारांना देण्यात आली नाही. उलट, तक्रारीनंतरही अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरूच राहिल्याचे ग्रामस्थांकडून वारंवार सांगण्यात आले, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
यासोबतच, आजाद समाज पार्टीच्या युवा अध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत वाघोली रेतीघाट परिसरात अवैध उत्खननामुळे मोठे व खोल खड्डे निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याखाली जात असल्याने नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ महसूल बुडविण्यापुरते मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षेशी, पर्यावरणीय हानीशी आणि प्रशासनाच्या जबाबदारीशी निगडित अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अमोल मारकवार यांनीही जिल्ह्यातील परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, चामोर्शीपुरतेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवैध रेतीचा व्यापार सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वी आरमोरी रेती घाटाबाबतही तक्रार दाखल केली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध शंका निर्माण होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
१) वेलतूरसह चामोर्शी तालुक्यातील सर्व संबंधित रेतीघाटांवरील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.
२) उपलब्ध फोटो, व्हिडिओ, लेखी तक्रारी आणि इतर पुरावे यांची सखोल पडताळणी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
३) चौकशीची निष्पक्षता अबाधित राहण्यासाठी चामोर्शी तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.
४) महसूल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
५) अवैध उत्खननामुळे निर्माण झालेल्या मोठ्या व खोल खड्ड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.
आजाद समाज पार्टीने स्पष्ट इशारा दिला आहे की, या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तात्काळ, कठोर आणि निष्पक्ष कारवाई केली नाही, तर पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट, महसूल विभागातील संभाव्य संगनमत, पर्यावरणाची हानी आणि जनतेच्या जीविताशी खेळ करणाऱ्या या प्रकाराविरोधात पक्ष कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!