24 Jun 2026, Wed

केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश..

एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा, विज्ञान व कला क्षेत्रात मॅपिंग करणार.

न्यू विदर्भ केसरी / मुख्य संपादक..

गडचिरोली, (जिमाका) दि. २२ : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा, विज्ञान तसेच कला व संस्कृती क्षेत्रातील क्षमतांचे वयोनुसार मॅपिंग करून सविस्तर डेटाबेस तयार करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पंडा बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण एम., जिल्हा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सायन्स इनोव्हेशन, स्पोर्ट्स आणि आर्ट अँड कल्चर या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करून त्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा वयोगटांनुसार विद्यार्थ्यांचे मॅपिंग करून जिल्हास्तरावर स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याचे व या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, विज्ञान स्पर्धा तसेच विविध राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, चामोर्शी येथील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून सध्या गडचिरोली येथे सुरू असलेले विद्यालय मूळ ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जागेत नव्याने मंजूर झालेले केंद्रीय विद्यालय सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष भर___ विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. आश्रमशाळा व एकलव्य विद्यालयांमध्ये नियमित समुपदेशन सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या, तणाव व भावनिक अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले.

पायाभूत सुविधांची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश___ आदिवासी विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या सर्व अपूर्ण बांधकामे व पायाभूत सुविधा विकासाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. विशेषतः चामोर्शी येथील एकलव्य विद्यालयातील मुलांचे वसतिगृह तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

वीज पुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निवारण___ आश्रमशाळा व एकलव्य विद्यालयांमधील वीज पुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित वीज जोडणी व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच क्रीडा, विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!