न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे मुख्य संपादक..
गडचिरोली :- दुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नुकताच असा एक ऐतिहासिक क्षण अनुभवला, जो त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. गडचिरोली जिल्हा वार्षिक उपाययोजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी मा. अविश्यांत पंडा यांच्या दूरदृष्टीपूर्ण पुढाकारातून जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणाऱ्या ९६ आदिवासी विद्यार्थ्यांना देशाची राजधानी दिल्ली येथे नाविन्यपूर्ण शैक्षणिक सहलीची संधी मिळाली.
या सहलीचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांची देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेली भेट. राष्ट्रपती भवनाच्या भव्य परिसरात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता. राष्ट्रपती महोदया यांच्याशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक होती, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा हर्षोल्हास पाहून उपस्थितांच्याही भावना दाटून आल्या.
एकेकाळी जंगलातील छोट्याशा गावातून शिक्षणासाठी प्रवास करणारी ही मुले आज देशाच्या प्रथम नागरिकांसमोर उभी होती. हा क्षण केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला.
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणी संग्रहालय यांसारख्या देशाच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, लोकशाही व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारल्या असून त्यांच्या मनात उच्च शिक्षण, संशोधन, प्रशासन आणि राष्ट्रसेवेची नवी स्वप्ने अंकुरली आहेत. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारा ठरला आहे.
“जंगलातून राष्ट्रपती भवनापर्यंतचा हा प्रवास केवळ सहल नव्हती, तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळालेली नवी पंखे होती,” अशी भावना पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, जिद्द आणि देशासाठी काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून ही सहल त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी पर्व ठरली आहे.

