न्यू विदर्भ केसरी | मुख्य संपादक फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, प्रतिनिधी :- कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या नगरी ते पोर्ला या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन अवघे एक वर्ष होत असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता नव्याने तयार झाल्यानंतरही विविध ठिकाणी उभ्या आणि आडव्या भेगा पडल्या असून भविष्यात या भेगा आणखी वाढून रस्त्याचे आयुष्य कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाचा निधी खर्च करूनही दर्जेदार काम झाले नसल्याचा आरोप होत आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, या कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या माहिती फलकावर “मुख्यमंत्री ग्राम सडक योजना” असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार हे काम “प्रधानमंत्री ग्राम सडक योजना” अंतर्गत मंजूर व करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कामाच्या फलकावर चुकीची माहिती का देण्यात आली? यामागे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणामुळे कामाच्या गुणवत्तेसोबतच निधी, प्रशासकीय पारदर्शकता आणि माहिती फलकावरील नोंदींच्या अचूकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील भेगांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

