कोरची आश्रम शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
कोरची, दि. ३० जून : प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि प्रेरणादायी वातावरणात झाली. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथे मंगळवार, दि. ३० जून रोजी प्रवेशोत्सव-२०२६ अत्यंत दिमाखात व जल्लोषात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे मोफत पाठ्यपुस्तके, पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून शाळेने शिक्षणाच्या नव्या पर्वाची मंगल सुरुवात केली. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. विशेषतः नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यामध्ये शाळेविषयी आत्मीयता व आकर्षण निर्माण व्हावे, या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी कोरची शहरातून पारंपरिक सजविलेल्या बंडीबैलावर नवागत विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बँड पथकाच्या दणदणाटात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात निघालेल्या या मिरवणुकीने परिसराचे लक्ष वेधून घेतले. याच निमित्ताने आयोजित पालक मेळाव्यात विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात शाळेच्या दैनंदिन वार्षिक नियोजन पुस्तकाचे अनावरण कोरची नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. हर्षलताताई भैसारे, नगरसेवक मा. मनोजभाऊ अग्रवाल आणि विस्तार अधिकारी लालाजी नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरालालजी ऊईके होते. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष सौ. हर्षलताताई भैसारे, तर सहउद्घाटक म्हणून नगरसेवक मनोजभाऊ अग्रवाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनितराम मडावी (पालक तथा एसएमसी सदस्य), पोलीस निरीक्षक श्री. पवार साहेब कोरची, निलकंठ मडावी, कुंती हुपुंडी, श्री. लालाजी मडावी (विस्तार अधिकारी) यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने पालक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. उमाकांत ढोक यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकला पटले, तर आभार प्रदर्शन गीता राऊत यांनी केले.
या यशस्वी प्रवेशोत्सवासाठी शिक्षक श्री. हरेश कामडी, अरुण कायंदे, राहुल अंधारे, धनश्री परतेती, अभिमन्यू वाटगुरे, प्रमोद शंभरकर, कृष्णा गावडे, मनोज गजभिये, भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, मनोज आचार्य, संतोष सहारे, अमित मेश्राम, अधीक्षिका सीमा कुरेकार, दिलीप ढेपले, ओमप्रकाश रहिले, सुमन अडभैया तसेच परिचारिका दिशा कोवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षणाबाबतचा सकारात्मक संदेश यामुळे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरचीचा प्रवेशोत्सव परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

