12 Sep 2026, Sat

गडचिरोलीत जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव ; ‘शिक्षण ही दररोजची तपस्या’ – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

गुलाब पुष्प, प्रभातफेरी, बग्गी मिरवणूक आणि पाठ्यपुस्तक वितरणातून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. 30 :- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, प्रभातफेरी, स्वागत मिरवणुका आणि पाठ्यपुस्तक वितरणाच्या माध्यमातून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या नव्या प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात करताना मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत____ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरखळा तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे उपस्थित राहून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी मुरखळा येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत त्याचे स्वागत केले. त्यानंतर प्रभातफेरी आणि वाजतगाजत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘शिक्षण ही दररोजची तपस्या’___ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले की, शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या दिवशी विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्याही मनात अनेक अपेक्षा आणि भविष्याची चिंता असते. मात्र आज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये दिसणारा उत्साह निश्चितच आशादायी असून तो गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा आहे.

ते पुढे म्हणाले, “शिक्षण ही एका दिवसाची गोष्ट नसून ती दररोजची तपस्या आहे. केवळ परीक्षेपूर्वी अभ्यास करून यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त, जिज्ञासा आणि एकाग्रतेच्या बळावर ज्ञान संपादन केले पाहिजे. शाळेत येऊन केवळ पाठ्यपुस्तकांचे ज्ञान घेणे पुरेसे नाही, तर बौद्धिक, मानसिक आणि कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे.”

भारताचे भविष्य आणि विकसित भारताचे स्वप्न आजच्या विद्यार्थ्यांवर अवलंबून असून त्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः पाच ते सात वर्षांच्या वयोगटात मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचा मजबूत पाया घालण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून मित्र, शिक्षक आणि परिसरातून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात तसेच दररोजच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक आणि पालकांनी मुलांमध्ये शिस्त, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार रुजवून त्यांना सक्षम नागरिक म्हणून घडवावे, असेही ते म्हणाले.

विश्राम कक्षाचे उद्घाटन_____ मुरखळा येथील शाळेत विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीदरम्यान विश्रांतीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या विश्राम कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना शालेय शिक्षण अधिक सुलभ व अनुकूल वातावरणात घेता येणार आहे.

आश्रम शाळेत बग्गीतून स्वागत____ आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आकर्षक बग्गीतून मिरवणूक काढून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. उपस्थित होते.

जिल्हाभरात मान्यवरांची उपस्थिती______ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेंढा येथे तर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोगाव येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

मुरखळा येथील कार्यक्रमास सरपंच दशरथ चांदेकर, जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे जगदीश चौधरी व इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!