27 Jul 2026, Mon

कसारी येथून “आव्हान हायस्कूल” ची मोफत स्कूल बस सेवा सुरू..

वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण ; पालकांना मोठा दिलासा..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

आंधळी फाटा, ता. कुरखेडा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ व्हावा या उद्देशाने बहुजन हिताय शिक्षण संस्था, कुरखेडा संचालित आव्हान हायस्कूल, आंधळी फाटा यांनी कसारी येथून शाळेपर्यंत मोफत स्कूल बस सेवा सुरू केली आहे. या बससेवेचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सुविधेमुळे कसारी परिसरातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेवर शाळेत ये-जा करण्याची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.

आव्हान हायस्कूल ही विद्यार्थ्यांसाठी विविध मोफत सुविधा उपलब्ध करून देणारी शाळा म्हणून परिसरात ओळखली जाते. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बस सेवा, मोफत गणवेश, मोफत शूज, मोफत पाठ्यपुस्तके तसेच मोफत एमएस-सीआयटी (MSCIT) प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.

आंधळी, नवरगाव, बेलगाव, वाघेडा, गुरनोली या जंगलव्याप्त गावांतील विद्यार्थ्यांना शाळेत येताना वन्यप्राण्यांच्या वावरामुळे जीवितास धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन संस्थेने यापूर्वीच मोफत स्कूल बस सेवा सुरू केली होती. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

कसारी हे गावदेखील घनदाट जंगल परिसरात असल्याने तेथे विविध वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये कायम चिंता होती. या पार्श्वभूमीवर कसारी येथील पालकांनी शाळा प्रशासनाकडे मोफत स्कूल बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. पालकांच्या मागणीची दखल घेत शाळा प्रशासनाने कसारी ते आव्हान हायस्कूल या मार्गावर मोफत स्कूल बस सेवा सुरू केली.

या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असून त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पालकांची चिंता मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

या समाजोपयोगी उपक्रमाचे कसारी परिसरातील पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मनापासून स्वागत केले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आव्हान हायस्कूलने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!