29 Jul 2026, Wed

मार्कंडादेव येथे जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांची संवाद..

बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन, मंदिर संवर्धन, पूरनियोजन, आरोग्य सुविधा व रोजगार विकासाला गती देण्याचे यंत्रणांना निर्देश…

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, दि. १:- मार्कंडादेव परिसरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे संबंधित यंत्रणांना दिले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी भूसंपादन, मंदिर संवर्धन, रस्ते, पूरनियोजन, आरोग्य सुविधा आणि स्थानिक युवकांच्या रोजगारासह विविध विकासकामांचा चर्चेतून आढावा घेतला. तसेच प्रत्येक विषयावर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
मार्कंडादेव येथे आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी विविध समस्या व विकासकामांतील अडचणी मांडल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच तसेच सार्वजनिक बांधकाम, पुरातत्त्व, एमएसआरडीसी, आरोग्य व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ माहिती घेत आवश्यक निर्देश दिले.

भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश___ मार्कंडादेव वळण मार्गासाठी उर्वरित जमिनीचे भूसंपादन नियमानुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. भूसंपादनाची प्रक्रिया नियमानुसार राबविण्याचेही सांगण्यात आले.

मंदिर संवर्धनाला गती देण्याचे__
मार्कंडादेव मंदिराच्या संवर्धनाची कामे संथ गतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मनुष्यबळ वाढवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पुरातत्त्व विभागाला दिले.

रस्ते कामांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता__
एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहतुकीत निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक पूर्णपणे बंद न करता योग्य नियोजनाद्वारे पुढील दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामाच्या कालावधीत नागरिकांना व भाविकांना त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यास सांगितले.

पूरस्थितीसाठी पूर्वतयारीचा आराखडा तयार करा__
अतिवृष्टी अथवा धरणातून पाणी सोडल्यामुळे मार्कंडादेवकडे जाणारे मार्ग बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी पर्यायी व्यवस्था, पूरनियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पूरकाळात आरोग्य सेवा अखंड ठेवण्यावर भर_
पूरस्थितीत नागरिकांना आरोग्य सुविधा खंडित होऊ नयेत यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ व सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. गरज भासल्यास तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होतील, यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

स्थानिक युवकांसाठी रोजगार आराखडा तयार होणार___
मार्कंडादेव व परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून स्वतंत्र रोजगार आराखडा तयार करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थानिक गरजांनुसार रोजगारनिर्मितीच्या संधी विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर संबंधित विभागांना निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देत विकासकामांची नियमित समीक्षा केली जाईल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून मार्कंडादेव परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधण्यावर भर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!