मुंबईत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पिपिंग समारंभ; गडचिरोली पोलीस दलातील वेगवर्धित पदोन्नतींची संख्या ४०४ वर..
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली, दि. ३ जुलै : माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेची प्रभावी छाप उमटविणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित पिपिंग समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे (Pips) लावून त्यांचा गौरव करण्यात आला.
वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनिल बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. माओवादग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात प्रतिकूल परिस्थितीत बजावलेल्या धाडसी सेवेमुळे त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या शौर्यपूर्ण सेवेचे कौतुक केले. माओवादविरोधी मोहिमेतील आव्हाने आणि दुर्गम भागात केलेल्या कार्यामुळे गडचिरोली पोलीस दलाने राज्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.
गडचिरोली पोलीस दलाच्या नावावर आतापर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके, १५१० पोलीस महासंचालक पदके आणि ४०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली गेली आहे.
समारंभाला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

