१ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्हाभर नोंदणी शिबिरे व जनजागृती उपक्रम ; युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, दि. ५ जुलै (जिमाका) :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat), गडचिरोली कार्यालयाच्या वतीने दिनांक १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्हाभर ‘मेरा युवा भारत’ विशेष नोंदणी व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना मेरा युवा भारत या राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठाशी जोडून स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून विशेष नोंदणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि डिजिटल नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अभियानाद्वारे युवकांना मेरा युवा भारत व्यासपीठाचे महत्त्व, त्यावरील नोंदणी प्रक्रिया आणि उपलब्ध विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
मेरा युवा भारत (MY Bharat) हे केंद्र शासनाचे युवकांसाठी विकसित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण डिजिटल व्यासपीठ असून, देशातील युवकांना स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रमांशी जोडण्याचे कार्य या माध्यमातून केले जाते. या व्यासपीठावर नोंदणी केलेल्या युवकांना विविध स्वयंसेवी उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, इंटर्नशिप, अभियाने आणि राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था तसेच संबंधित विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून अधिकाधिक युवक-युवतींची नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मेरा युवा भारत, गडचिरोली कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी या अभियानाचा लाभ घेऊन मेरा युवा भारत पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणीसाठी https://www.mybharat.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

