विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनोखा उपक्रम ; शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रपट महोत्सवाची सुरूवात..
फुलचंद वाघाडे / न्यू विदर्भ केसरी & जिल्हा गर्जना न्यूज..
गडचिरोली :- गडचिरोली शहरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ‘नगराध्यक्ष चित्रपट महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाला. गडचिरोली नगरपरिषदेच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा शुभारंभ दिनांक १ जून २०२६ रोजी नगराध्यक्ष ॲड. सौ. प्रणिती ताई सागर निंबोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
एम.डी.एम.टी. मल्टी थिएटर, धानोरा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्याला शहरातील मान्यवर, नगरसेवक, न.प. सभापती, न. प. कर्मचारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत नगरपरिषदेच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे तसेच सकारात्मक आणि संस्कारित विचारसरणी निर्माण करणे हा आहे. बदलत्या काळात डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, योग्य आणि मार्गदर्शक आशय असलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
या चित्रपट महोत्सवामध्ये शैक्षणिक, ऐतिहासिक, सामाजिक, विज्ञाननिष्ठ तसेच प्रेरणादायी विषयांवरील निवडक आणि दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर ज्ञानवर्धन आणि जीवनमूल्यांची जाणीव करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हा महोत्सव १ मे ते ३० जून २०२६ या कालावधीत नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला असून, शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव विशेष उपयुक्त ठरणार असून, त्यांना अभ्यासाबरोबरच वेगळ्या माध्यमातून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तसेच, या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास, सामाजिक जाणीव वाढविणे आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचारक्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नगर परिषद प्रशासनाने शहरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा. गडचिरोली शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

