माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला सदिच्छा भेट : नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली, दि.८ मे २०२६ :- गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला आज माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देत येथील कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.
राज्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे हजारो कुटुंबांना नवजीवन मिळत असल्याचे यावेळी मा.खा.डॉ. नेते यांनी गौरवोद्गारांतून सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी, आरोग्य विषयक मदत योजना आणि गरजू रुग्णांसाठी शासनाने उभारलेली सक्षम यंत्रणा ही जनतेप्रती संवेदनशील प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. नेते यांनी संबंधित अधिकारी डॉ. मनोहरजी मडावी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल, याबाबत चर्चा केली.
तसेच उपचारासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री सहायता निधी,आयुष्मान भारत योजनेसह विविध उपचार सहाय्य योजनांची माहिती घेत असताना डॉ. नेते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य क्षेत्रात घेतलेले निर्णय हे गरीब आणि गरजू जनतेसाठी अत्यंत दिलासादायक आहेत. योग्य माहितीच्या अभावी कोणताही नागरिक योजनांपासून वंचित राहू नये. प्रत्येक गरजू व्यक्तीने शासनाच्या या सुविधांचा लाभ घ्यावा.”
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मदत कक्षामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रसंगी कक्ष अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहरजी मडावी तसेच हर्षाली नैताम उपस्थित होते.
राज्याच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या योजनांचे कौतुक करत, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे शासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत डॉ. नेते यांनी व्यक्त केले.

