10 Jun 2026, Wed

“उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज !!..

अतिउष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा हायअलर्ट; सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

गडचिरोली, :- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून प्रशासनातर्फे ‘अतिउष्णतेची लाट’ (Extreme Heat Wave) घोषित करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःचा बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहेत. या विशेष कक्षांमध्ये कूलर, वातानुकूलित सुविधा, विशेष बेड तसेच आपत्कालीन उपचारासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ओआरएस, आयव्ही फ्लूइड्स आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी आशा स्वयंसेविकांमार्फत घराघरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात शेतात किंवा इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यंत आवश्यक असून चक्कर येणे, मळमळ होणे किंवा अस्वस्थ वाटल्यास घरगुती उपचारांवर वेळ न घालवता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे त्यांनी आवाहन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, अतिउष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन उष्माघाताचा धोका निर्माण होतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालये पूर्णपणे सज्ज असून सर्व वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शरीराचे तापमान अचानक वाढणे, चक्कर येणे, मळमळ होणे, असह्य डोकेदुखी, अत्यधिक तहान लागणे तसेच लघवीचे प्रमाण कमी होणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर परिस्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, भ्रम निर्माण होणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणेही दिसून येऊ शकतात. उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा नारळपाणी यांचे नियमित सेवन करून शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे. हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे. कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे, मद्य, चहा, कॉफी किंवा अधिक साखरयुक्त पेये सेवन करणे टाळावे. लहान मुले अथवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात एकटे सोडू नये. आरोग्याबाबत कोणतीही तक्रार जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी असून कोणालाही अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल करावे अथवा रुग्णवाहिकेसाठी १०८ किंवा १०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!