‘संडे ऑन सायकल’ उपक्रमातून फिट इंडिया अभियानाला चालना ; क्रीडाप्रेमी, नागरिक व खेळाडूंना सहभागाचे आवाहन..
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली :- नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक सायकल दिनानिमित्त ७ जून २०२६ रोजी ‘Sunday on Cycle’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात येत असून जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ‘फिट इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून सायकलिंग हा त्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो. यावर्षीच्या जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘Sunday on Cycle’ उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत खेलो इंडिया आर्चरी केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आष्टी (ता. चामोर्शी) येथे रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सायकल चालविण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, हृदयविकार व इतर जीवनशैलीजन्य आजारांचा धोका कमी होतो, तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीत युवक, विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘फिट इंडिया’ अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
