24 Jun 2026, Wed

सागवान लाकडासाठी ३ लाखांच्या लाचेची मागणी ; RFO, वनरक्षकासह दलालास रंगेहाथ अटक!

वनपरिक्षेत्राधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नीतेश मडावी आणि खाजगी दलाल प्रदीप मंडल या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात.

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

मुलचेरा :- गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात अवैध सागवान प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ३ लाखांची लाच मागून ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना आरएफओ, वनरक्षक आणि दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. अवैध सागवान लाकूड प्रकरणात दाखल वनगुन्ह्याच्या आधारे फर्निचर विक्रीचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार नसल्याचे आश्वासन देत तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक आणि एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी रंगेहाथ पकडले. मागितलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. मुलचेरा तालुक्यातील पेड्डीगुडम येथे घडलेल्या या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये पेड्डीगुडमचे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीनिवास मदनय्या कटकू (५२), वनरक्षक नीतेश पांडुरंग मडावी (३७) आणि खासगी व्यक्ती प्रदीप गणेश मंडल (५०) यांचा समावेश आहे.

वनगुन्ह्याचा धाक दाखवून लाचेची मागणी___ तक्रारदाराविरुद्ध ११ जून २०२६ रोजी अवैध सागवान लाकूड बाळगल्याप्रकरणी पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा आधार घेत तक्रारदाराचा फर्निचर विक्री परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार नसल्यासाठी १७ जून रोजी वनरक्षक मडावी यांनी, वनपरिक्षेत्राधिकारी कटकू यांच्या सांगण्यावरून, लाचेची मागणी केली. त्यानंतर १८ जून रोजी स्वतः कटकू यांनी तीन लाख रुपयांची मागणी करत त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये खासगी व्यक्ती प्रदीप मंडल याच्याकडे देण्यास सांगितल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

दलालाला रंगेहाथ पकडले___ यासंदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर १९ जून रोजी सकाळी गणेशपूर-मुलचेरा मार्गावर सापळा रचण्यात आला. वनपरिक्षेत्राधिकारी कटकू यांच्या वतीने ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना दलाल प्रदीप मंडल याला पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी कटकू आणि वनरक्षक मडावी यांनाही ताब्यात घेण्यात आले. पेड्डीगुडम हे अतिसंवेदनशील आणि माओवादप्रभावित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अशा भागात यशस्वी सापळा रचून एसीबीने लाचखोर अधिकाऱ्यांना दणका दिला. ही कारवाई उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बगाटे व त्यांच्या पथकाने केली.

वादग्रस्त कारकीर्द पुन्हा चर्चेत___ दरम्यान, या कारवाईमुळे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीनिवास कटकू यांची वादग्रस्त कारकीर्द पुन्हा चर्चेत आली आहे. सिरोंचा येथे कार्यरत असताना कथित सागवान तस्करी प्रकरणात त्यांचा सहभाग आढळल्याने सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आंतरराज्य सागवान तस्करांशी त्यांचे हितसंबंध असल्याची चर्चा त्यावेळी प्रशासकीय वर्तुळात होती. या प्रकरणातील विभागीय चौकशी अद्याप सुरू असतानाच त्यांना लाचखोरी प्रकरणात अटक झाल्याने वन विभागात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!